विधी प्रवेश प्रक्रियेसाठी र. ए. सोसायटी, कीर महाविद्यालय व्यवस्थापनाने केली आवश्यक कार्यवाही

रत्नागिरी दि. ८ ऑगस्ट : सध्या सीईटी सेल मार्फत ३ वर्षीय व ५ वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचा पहिली फेरी सुरू असून ती ९ ऑगस्टपर्यंत चालू असेल. या फेरीमध्ये महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालये तसेच आपले श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालय विद्यार्थ्यांना कॉलेज ऑप्शन फॉर्ममध्ये दिसत नसून शासनाने यासाठी असे कारण दिले आहे की, ज्या महाविद्यालयांकडे बार कौन्सिल ऑफ इंडियाचे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठीचे संलग्नता पत्र नाही ती महाविद्यालये पहिल्या यादीत समाविष्ट केली गेली नाहीत.
यासंदर्भात रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे यांनी संस्थेच्या वतीने खुलासा केला आहे. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रात म्हटले आहे की, श्रीमान भागीजीशेठ कीर महाविद्यालयाने १ मार्च २०२६ रोजी (म्हणजेच बार कौन्सिल ऑफ इंडियाने विहित केलेल्या मुदतीत) आवश्यक शुल्कासह बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे ऑनलाइन अर्ज सादर केला होता.
महाविद्यालयाने बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीचे मुंबई विद्यापीठाचे वार्षिक संलग्नता पत्र सादर न केल्यामुळे बौर कौन्सिल ऑफ इंडियाने हा अर्ज प्रलंबित ठेवला होता. या विलंबाचे कारण असे होते की, मुंबई विद्यापीठ सर्व संलग्न महाविद्यालयांना जून महिन्यात वार्षिक संलग्नता प्रदान करते.
या संदर्भात अनेक विधी महाविद्यालयांनी मुंबई विद्यापीठाकडे संपर्क केल्यानंतर मुंबई विद्यापीठाचे मा. कुलसचिव यांनी बार कौन्सिल ऑफ इंडियाला पत्र लिहून त्याची प्रत सर्व महाविद्यालयांना देखील पाठविली, ज्यात त्यांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यान्वये मुंबई विद्यापीठ सर्व विधी महाविद्यालयांना जून महिन्यातच संलग्नता प्रमाणपत्र देत असून यासाठी महाविद्यालयांना कोणताही दंड करू नये अशी विनंती केली होती.
श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचे संलग्नता पत्र १ जुलै २०२६ रोजी प्राप्त झाले आणि त्यानंतर आम्ही ते बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या पोर्टलवर अपलोड केले. आता आम्ही अशा टप्प्यावर आहोत जिथे बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे संपूर्ण तपशील आणि शुल्कासह अर्ज सादर केला गेला आहे आणि आम्हाला पुढील काही दिवसांत बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी व कॉलेज व्यवस्थापन यांनी आवश्यक ती सर्व कार्यवाही केलेली असून आता सीईटी सेल, उच्च शिक्षण विभाग यांना अशी विनंती केली आहे की, कृपया आमच्या महाविद्यालयाची माहिती (प्रोफाईल) स्वीकारून ती मंजूर करावी आणि आम्हाला या वर्षीच्या ३ वर्षीय अभ्यासक्रम आणि बीए, एलएलबी- ५ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रत्येकी एका तुकडीसाठी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगी द्यावी.


