रत्नागिरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २३ वे देहदान; ‘सेवा संकल्प अभियाना’तील पहिलेच दान

रत्नागिरी, दि. २१ सप्टेंबर :- वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी नामदेव दामोदर पाध्ये (वय ८५, रा. जोशी वठार, नाटे) यांच्या पार्थिवाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आज देहदान करण्यात आले. शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत झालेले हे पहिले, तर महाविद्यालयातील एकूण २३ वे देहदान ठरले आहे.

कै. नामदेव पाध्ये यांचे १९ सप्टेंबर २०२६ रोजी अल्पशा आजाराने लोटलीकर हॉस्पिटल येथे निधन झाले. त्यांनी २० मार्च २०२५ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मरणोत्तर देहदानाचे इच्छापत्र भरून दिले होते. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांनी त्यांच्या इच्छेचा आदर करत हा देहदानाचा उदात्त निर्णय घेतला. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते कै. पाध्ये यांचे सुपुत्र महेश पाध्ये यांना सन्मानदर्शक प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी मृत कै. पाध्ये यांच्या स्नुषा शुभदा पाध्ये, कन्या अर्चना गोखले, सुषमा गगनग्रास, ज्योती नेने, जावई तसेच डॉ. महेंद्र पाध्ये, प्रभात पाध्ये, गोपीनाथ करंबेकर, श्रीकांत गोखले यांच्यासह इतर नातेवाईक उपस्थित होते.

सदर देहदानाची प्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव तसेच पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, प्रियल आडीवरेकर, मिथिलेश मुरकर, मिहीर लोंढे, श्रेयश जोशी, राज पेडणेकर, नितीन घोसाळकर आणि वाहनचालक सागर नारकर व प्रणय पाटील यांनी पूर्ण केली. पाध्ये कुटुंबीयांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button