रत्नागिरी

निसर्ग कुशीतील धामापुरात सजली भविष्याची स्वप्नं

गणेशोत्सवातील देखाव्यांतून गावकऱ्यांनी मांडली 'स्मार्ट आणि शाश्वत' विकासाची ब्लू-प्रिंट

रत्नागिरी, दि. २१ सप्टेंबर : भोवताली सह्याद्रीच्या उत्तुंग कड्यांचा खडा पहारा, डोंगरावरून फेसाळत कोसळणारे दोन जलप्रपात आणि गावाला कवेत घेऊन वाहणारी निवळशंख गड सरिता..सोबतीला शास्त्री अन् कापशी ! निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या संगमेश्वर तालुक्यातील धामापूर या निसर्गसुंदर गावाने यंदाच्या गणेशोत्सवात एका नव्या क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आहे. केवळ डीजे आणि ढोल-ताशांच्या आवाजात न रमता, लोकमान्य टिळकांच्या मूळ विधायक समाजप्रबोधनाच्या संकल्पनेला उजाळा देत, धामापूरकरांनी ‘२०४७ चे विकसित धामापूर’ कसे असेल, याचे स्वप्न थेट गणेश देखाव्यांतून जिवंत केले.

सुवर्णसूर्य फाऊंडेशनचे संस्थापक संचालक प्रसाद देवस्थळी यांच्या कल्पक संकल्पनेतून आयोजित या अनोख्या स्पर्धेने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. दुबईच्या जगप्रसिद्ध ‘म्युझियम ऑफ द फ्युचर’च्या धर्तीवर पुढच्या २१ वर्षांनंतरचे आपले गाव कसे असावे, याचे अप्रतिम आणि विचार करायला लावणारे प्रारूप ग्रामस्थांनी मांडले.

वाड्या-वाड्यांमधून उमटली समृद्ध भविष्याची चाहूल

गावातील धनावडेवाडी, पडेवाडी, ढोपारखोलवाडी , तांबडवाडी, गुरववाडी, भडवळेवाडी, गोवळवाडी, रामणवाडी, घारेवाडी, भेलेवाडी आणि भुसेवाडी अशा विविध वाड्यांमधील २९ स्पर्धकांनी एकत्र येत आपल्या कल्पकतेने हे देखावे साकारले. केवळ देखावा म्हणून नव्हे, तर कृती आराखडा म्हणून या मांडणीकडे पाहिले जात आहे.

देखाव्यांतील ‘भविष्यवेधी’ ठळक वैशिष्ट्ये

ड्रोनच्या सहाय्याने शेती, आधुनिक लागवड पद्धती आणि शेतीकामात रोबोटिक्सचा समावेश असणारी भविष्यातील स्मार्ट शेती.

पर्जन्य जलसंधारण आणि बोअरवेल पुनर्भरण करून ‘पाणीदार धामापूर’ साकारणे, तसेच संपूर्ण गावाला अपारंपरिक सौरऊर्जेवर स्वयंपूर्ण बनवणे.

गावागावांत ईव्ही (EV) चार्जिंग स्टेशन्सचे जाळे आणि अत्याधुनिक दळणवळण व्यवस्थेतून शाश्वत गतिशीलता आसेल.

चालुक्यकालीन ऐतिहासिक राजवाड्यांचे अवशेष जपतानाच, गावातील दोन निसर्गरम्य धबधब्यांचा विकास करून धामापूरला इतिहास आणि निसर्गाची ‘पर्यटन पंढरी’ बनवणे. मत्स्यशेतीसोबत पर्यावरणपूरक जलपर्यटनाचा संगम साधणे.

आरोग्य आणि स्वयंपूर्णता होण्यासाठी दुर्गम भागात सक्षम मोबाईल नेटवर्क, टेली-मेडिसिन व रोबोटिक आरोग्य सुविधा आणि स्थानिक तरुणांना गावातच रोजगार देणारे कृषी-पशुसंवर्धन उद्योग.

एकतेतून साकारणारा समृद्ध गावगाडा

सुवर्णसूर्य फाउंडेशन च्या या विधायक यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी नवसरी देवीचे मानकरी अनिल मिंडे गावकर, कीर्तिराज सागवेकर, सचिन गुरव, मुकेश पड्ये, लवू महाकाळ, निलेश गुरव, दीपक बेंडके, माजी सरपंच शांताराम भायजे यांनी सर्वांना प्रोत्साहित केले आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि महिला वर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

प्रदीप धनावडे, राज धनावडे, विशाल धनावडे, रमेश धनावडे, संचित पड्ये, मुकुंद पड्ये, रोहित बोले, मुकेश पड्ये, सूरज मिंडे, नितीन पवार, ऋषीकेश रामाणे, रोशन रामाणे, स्वप्नील भायजे, शौर्य गिजये, रोशन भायजे, शिवराम भायजे, सुजय रामाणे, श्रीतेजन रामाणे, रविंद्र चव्हाण, अजय गुरव, अनिता महाडीक, आयुष देवरुखकर, सचिन चव्हाण, विद्याधर गावडे, रूपेश कांबळे, रोशन धामणाक, राहुल महाडीक, महेश गोरे, वल्लरी देवस्थळी इत्यादीनी गणेश देखावे साकारुन या उपक्रमाला वेगळीच उंची प्राप्त करून दिली.

अभ्यंकर-कुलकर्णी महाविद्यालयात अर्थशास्त्र विषय शिकवणाऱ्या आदिती कोकजे यांनी या उपक्रमाचे परीक्षण केले. पुढील काही दिवसांतच सर्वोत्कृष्ट देखाव्यांची निवड करून जवळपास ₹ ५१ हजारची बक्षिसे देऊन सहभागींचा गौरव करण्यात येणार आहे.

परंपरेचा सन्मान करत आधुनिकतेची कास धरणारा हा उपक्रम कोकणातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील इतर खेड्यांसाठी दिशादर्शक ठरावा असाच आहे.

जेव्हा विचारांना नियोजनाची जोड मिळते, तेव्हा स्वप्ने प्रत्यक्षात उतरतात. धामापूरच्या मातीत गणेशोत्सवाच्या निमित्ताने पेरलेली ही विकासाची बीजे २०४७ च्या सुवर्ण महोत्सवी भारतात एक आदर्श ‘स्मार्ट व्हिलेज’ म्हणून बहरलेली दिसतील, यात तीळमात्र शंका नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button