रत्नागिरी

राजिवडा येथे मच्छीमार नौका समुद्रात उलटली

रत्नागिरी दि. २१ सप्टेंबर : मासेमारी आटोपून किनाऱ्याकडे परतणाऱ्या एका मच्छीमार नौकेला समुद्रात उसळणाऱ्या लाटांचा फटका बसला. या दुर्घटनेमुळे नौकेवरील सर्वच्या सर्व आठ मच्छीमार थेट उसळणाऱ्या समुद्राच्या पाण्यात फेकले गेल्याने परिसरात काही काळ प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रविवारी सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास ‘ओशियन पर्ल’ नावाची ही नौका राजिवडा जेटीच्या दिशेने येत असताना एका महाकाय लाटेने तिच्यावर जोरदार आघात केला. यामुळे नौकेचा तोल अचानक बिघडला आणि ती क्षणात समुद्रात उलटली.

पाण्यात फेकल्या गेलेल्यांमध्ये साद हुसये (२१), मुहाफीस मुकादम (२२), अहमद सोलकर (३८), इम्तियाज मुजावर (२१), नासिर हुसये (६०), शोएब हुसये (३०), इमरान डंगी (३५) आणि तौसीफ सोलकर (३५, सर्व रा. राजीवडा) या स्थानिक मच्छीमारांचा समावेश होता. समुद्राच्या वेगवान प्रवाहात अडकल्याने या सर्वांचा जीव अत्यंत धोक्यात सापडला होता. मात्र, त्याच वेळी त्यांच्या मागोमाग येत असलेल्या ‘अल सुरया’ या दुसऱ्या बोटीवरील खलाशांच्या ही दुर्घटना तात्काळ निदर्शनास आली. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जराही वेळ न दवडता तातडीने मदतकार्य हाती घेतले.

‘अल सुरया’ बोटीवरील खालिद होडेकर, अजमल हुनेरकर, कैफ होडेकर, खलील मजगावकर आणि यासीन पावसकर या धाडसी खलाशांनी तत्परता दाखवत पाण्यात बुडत असलेल्या सर्व आठही मच्छीमारांना सुखरूप बाहेर काढले. या खलाशांच्या प्रसंगावधानामुळे व धाडसामुळे एका मोठ्या अनर्थ टळला. समुद्रात बुडणाऱ्या आठही सहकाऱ्यांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यात आले. खलाशांनी दाखवलेल्या या असीम धैर्याचे आणि तत्परतेचे संपूर्ण राजीवडा परिसरातून मोठे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button