सीमा सुधीर देवस्थळी यांना मुंबई विद्यापीठाची पीएच.डी.

रत्नागिरी दि. २१ सप्टेंबर : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या आर. पी. गोगटे कला व विज्ञान महाविद्यालय व आर. व्ही. जोगळेकर वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त) येथील संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणाऱ्या सीमा सुधीर देवस्थळी यांना मुंबई विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (Ph.D.) पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली.
त्यांनी रसायनशास्त्रात सपोर्टेड कॅटॅलिस्ट्सच्या (आधारित उत्प्रेरकांच्या) संरचना आणि उत्प्रेरक गुणधर्मांवरील अभ्यास या विषयावर संशोधन पूर्ण केले आहे. त्यांनी गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली Ph.D. डिग्री प्राप्त केली.
टाकाऊ वस्तूंपासून उत्प्रेरक तयार करणे हे त्यांच्या विशेष अभ्यासाचे व संशोधनाचे क्षेत्र आहे. त्यांच्या संशोधनामध्ये विविध उत्प्रेरके बनवून त्यांचा उपयोग रासायनिक अभिक्रियांमध्ये तपासण्यात आला आहे. अशा पद्धतींमुळे निसर्गावर होणारा नकारात्मक परिणाम काही प्रमाणात कमी होऊ शकतो हे या संशोधनातून अधोरेखित करण्यात आले आहे. पीएच.डी. पदवी प्राप्त करताना त्यांनी दोन शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध केले. आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेऊन आपले संशोधन कार्य सादर केले. गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विषयाच्या पीएचडी सेंटरमधून पीएचडी पदवी प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या विद्यार्थिनी आहेत. या उल्लेखनीय यशाबद्दल सीमा देवस्थळी यांचे अभिनंदन र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.



