वणौशी तर्फे दुमदेव येथे प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; काळेश्वरी मंदिरात एकमुखी निर्णय

दापोली दि. २१ सप्टेंबर (सागर गोवळे) :- दापोली तालुक्यातील वणौशी तर्फे पंचनदी गावातील भिवबंदर आणि आघारी महसुली हद्दीत प्रस्तावित असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. महाराष्ट्र शासन आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड यांच्यात या प्रकल्पाबाबत नुकताच मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार स्वाक्षरित झाला. या पार्श्वभूमीवर, ग्रामदैवत श्री काळेश्वरी मंदिरात स्थानिक आणि मुंबईस्थित ग्रामस्थांची संयुक्त सभा पार पडली, ज्यामध्ये हा प्रकल्प गावात होऊ न देण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला.
प्रकल्पाबाबत वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांवरून माहिती समोर आली असली, तरी स्थानिक ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थांना प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी एकत्र येत या सभेचे आयोजन केले होते.
पर्यावरण आणि आरोग्यावर गंभीर परिणामांची भीती
सभेत बोलताना उपस्थितांनी लोटे एमआयडीसीच्या रसायनांमुळे वाशिष्टी नदी व दाभोळ खाडीतील मत्स्य व्यवसायावर झालेल्या विपरीत परिणामांचा दाखला दिला. “प्रशासन साध्या प्रदूषण समस्येवर उपाययोजना करू शकत नाही, तिथे विध्वंसकारी अणुऊर्जा प्रकल्प लादल्यास येथील फळबागा, शेती, सागरी जीवन आणि मानवी आरोग्यावर भीषण परिणाम होतील,” अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.
कायदेशीर आणि जनआंदोलनाचा इशारा
“भावी पिढीच्या सुरक्षेसाठी हा प्रकल्प आमच्या माथी मारू नका,” असा इशारा देत, सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून ग्रामस्थांनी अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात एकमुखी निर्धार केला. सभेच्या शेवटी ग्रामदैवत श्री काळेश्वरीला गाऱ्हाणे घालून “हा प्रकल्प वरच्यावर जिरू दे” अशी प्रार्थना करण्यात आली. यापुढे या प्रकल्पाविरोधात कायदेशीर मार्ग आणि जनआंदोलनाच्या माध्यमातून तीव्र लढा उभारण्याचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला आहे.



