
दापोली दि. १३ सप्टेंबर (सागर गोवळे) : झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश केवळ कागदावर किंवा भाषणापुरता मर्यादित न ठेवता, लावलेली रोपे प्रत्यक्षात जगलीच पाहिजेत या उदात्त हेतूने ‘क्षितिज कलामंच, दापोली’ यांच्या वतीने पाडले येथे वृक्षारोपण मोहीम अत्यंत उत्साहात पार पडली.
अनेकदा वृक्षारोपण मोहिमा राबवून रोपे लावली जातात; परंतु त्यानंतर होणाऱ्या दुर्लक्षामुळे ती सुकून मरतात. हाच अनुभव लक्षात घेऊन क्षितिज कलामंचने यावर्षी एक अत्यंत वेगळी आणि कौतुकास्पद संकल्पना राबवली. केवळ सार्वजनिक ठिकाणी झाडे न लावता, गावातील नागरिकांना प्रत्यक्ष फळझाडे व फूलझाडांची रोपे भेट म्हणून देण्यात आली. ही रोपे आपापल्या घराच्या आवारात लावून ती जगवण्याची आणि त्यांची निगा राखण्याची जबाबदारी संबंधित ग्रामस्थांवर सोपवण्यात आली.
या अभिनव उपक्रमामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या रोपाची प्रेमाने काळजी घेईल आणि ही रोपे नक्कीच जगतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. या मोहिमेमुळे निसर्गाचे संवर्धन तर होईलच, शिवाय भविष्यात मिळणारी फळे आणि फुलांमुळे ग्रामस्थांनाही एक वेगळा आनंद आणि समाधान लाभणार आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी क्षितिज कलामंचाचे अध्यक्ष श्री. अभिजीत भोंगले, संस्थापक श्री. सुनील कदम, श्री. दिगंबर पावसे आणि श्री. रुपेश सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. क्षितिज कलामंचच्या या अनोख्या आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे पाडले गावच्या ग्रामस्थांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.



