रत्नागिरी

मुंबई-कोकण मार्गावर ७० गावांचा ‘एल्गार’! कोकण रेल्वे झुकली, विलवडेवासीयांच्या एकजुटीचा अभूतपूर्व विजय

विलवडे दि. २१ सप्टेंबर (सागर गोवळे) : काल आमच्या हक्काच्या मागण्या मान्य करा, नाहीतर गाठ आमच्याशी आहे!” असा खणखणीत इशारा देत रविवारी रस्त्यावर उतरलेल्या ७० हून अधिक गावांतील जनसागरापुढे अखेर कोकण रेल्वे प्रशासनाला मान झुकवावीच लागली. लांजा, राजापूर आणि अणुस्कुरा घाटमाथ्यावरील लाखो प्रवाशांचे श्रद्धास्थान व जीवन वाहिनी असलेल्या विलवडे रेल्वे स्थानकावर रविवारी झालेला ‘जनआक्रोश’ आणि लाक्षणिक उपोषण ऐतिहासिक ठरले!

काय घडले आंदोलनाच्या दिवशी?

‘विलवडे रेल्वे प्रवासी संघटना’ (मुंबई व ग्रामीण संघर्ष समिती) च्या हाकेला प्रतिसाद देत संपूर्ण परिसरातील चाकरमानी आणि ग्रामस्थ आज एकवटले होते.

जनसागराचा महापूर: लांजा-राजापूर सीमावर्ती भाग, अणुस्कुरा घाट आणि वैभववाडी तालुक्यातील तब्बल ७० पेक्षा जास्त गावांतील हजारो नागरिक, महिला आणि युवक विलवडे स्थानकात धडकले.

रेल्वे प्रशासन हादरले: स्थानकावरील प्रचंड गर्दी आणि प्रवाशांचा वाढता संताप पाहून कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने पळापळ करत घटनास्थळी दाखल व्हावे लागले.

प्रवाशांचा संताप आणि ३ मुख्य मागण्या:

प्रमुख एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा: मुंबई व इतर महत्त्वाच्या शहरांत जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना त्वरित विलवडे येथे स्टॉप द्या.

स्थानकावर मुलभूत सुविधा: अद्ययावत शेड, पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे आणि बसण्याची योग्य व्यवस्था तातडीने करा.

प्रवाशांची वर्षानुवर्षांची पिळवणूक थांबवा: थांबा नसल्यामुळे स्थानिक प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करत दूरच्या स्थानकांवर जावे लागत होते, ते बंद व्हावे.

७० गावांची वज्रमूठ अन् प्रशासनाची माघार!

आंदोलनाचा उग्र रूप पाहून अखेर रेल्वे प्रशासनाने नमते घेतले. अधिकाऱ्यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आणि लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे लेखी/अधिकृत आश्वासन आंदोलकांना दिले. त्यानंतरच ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले.

“हा फक्त एका आंदोलनाचा शेवट नाही, तर विलवडे स्थानकाच्या विकासाची आणि कोकणवासीयांच्या हक्काची एक नवी पहाट आहे!” — आंदोलकांचा बुलंद आवाज.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button