रत्नागिरी

नागरिकांच्या समस्या जाणून घेत बाधित होऊ शकणाऱ्या परिसराची ना. उदय सामंत यांचेकडून प्रत्यक्ष पाहणी

रत्नागिरी दि. २१ सप्टेंबर :- रत्नागिरी विमानतळावर आयएलएस सिस्टीम बसवण्यासाठी सुमारे सात एकर जागेची आवश्यकता आहे. मात्र, या प्रक्रियेत स्थानिकांची घरे आणि मंदिर बाधित होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांची भेट घेऊन आपल्या समस्या आणि चिंता मांडल्या.

नागरिकांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर ना. उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांसोबत थेट विमानतळ परिसरात जाऊन आयएलएससाठी प्रस्तावित जागा तसेच त्याच्या आसपासच्या बाधित होऊ शकणाऱ्या घरांची आणि जागांची प्रत्यक्ष पाहणी केली. केवळ कागदावरील नकाशे पाहून निर्णय घेण्याऐवजी प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे, अशी भूमिका यावेळी ना. उदय सामंत यांनी मांडली.

विमानतळाचा विकास महत्त्वाचा आहे; मात्र विकासाच्या नावाखाली स्थानिकांचे राहते घर किंवा मंदिर तोडले जाणार नाही, याची ना. उदय सामंत यांनी नागरिकांना स्पष्टपणे ग्वाही दिली.

आयएलएस सिस्टीमसाठी पर्यायी पर्यायांचाही विचार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासाठी दमण विमानतळावर वापरल्या जाणाऱ्या एअरपोर्ट सिस्टीमबाबत तेथील प्रशासनाशी चर्चा करून रत्नागिरीसाठी त्याचा उपयोग करता येईल का, हे तपासण्यास सांगितले आहे.

विमानतळाचा विकासही झाला पाहिजे आणि स्थानिकांचे घर, श्रद्धास्थान व हक्कही सुरक्षित राहिले पाहिजेत. दोन्हींचा समतोल साधूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन ना. उदय सामंत यांनी या प्रसंगी भेटायला आलेल्या स्थानिक नागरिकांना दिलं

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button