रत्नागिरी

राजापूर – आजिवली येथील शेतकऱ्याचा महावितरणच्या विद्युत तारेचा धक्का बसल्याने मृत्यू

राजापूर दि. २७ सप्टेंबर :- शेतात गुरे चरायला गेलेल्या एका गरीब शेतकऱ्याचा महावितरणच्या जमिनीवर लोंबकळणाऱ्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील आजिवली येथे शनिवारी सायंकाळी उशीरा घडली आहे. जयवंत राणे (वय ४९, रा. अजिवली) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त झाले होते.

याबाबत माहितीनुसार, जयवंत राणे हे सायंकाळच्या सुमारास गावातील शिवारात गुरे चारण्यासाठी गेले होते. सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास गवतात पडलेल्या महावितरणच्या विद्युत तारेचा त्यांना जोरदार धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच अजिवली गावचे सरपंच संजय राणे यांच्यासह ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी जयवंत यांना नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉ. तांदळे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेनंतर सरपंच संजय राणे यांनी पाचल येथील महावितरण कार्यालयाशी तत्काळ संपर्क साधून घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. परंतु, एवढी मोठी दुर्घटना घडूनही रात्री पावणेदहा वाजेपर्यंत पाचल अथवा राजापूर कार्यालयातील एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही.त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते.

महावितरणच्या या अत्यंत बेजबाबदार व ढिसाळ कारभाराबद्दल उपस्थित ग्रामस्थांमधून संतापाची लाट उसळली. घटनेची माहिती मिळताच रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे बीट अंमलदार दत्तात्रय बाणे, पोलीस कॉन्स्टेबल रामदास पाटील, यांच्यासह राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. मृत जयवंत राणे हे अत्यंत गरीब कुटुंबातील असून शेती हाच त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेचा मुख्य आधार होता. त्यांच्या निधनाने घरातील कर्ता पुरुष गमावल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे महावितरण किंवा शासनाने ठोस आर्थिक भरपाई जाहीर करावी, अन्यथा शवविच्छेदन करू दिले जाणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी लावून धरला.

अखेर रात्री पावणेदहा वाजल्यानंतर महावितरणचे राजापूर उपकार्यकारी अभियंता मंगेश क्षीरसागर यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सल्ल्यानुसार मृतदेह शवविच्छेदनासाठी रायपाटण ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान या घडलेल्या दुर्घटनेबद्दल परीसरात जोरदार खळबळ उडाली. वितरणच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button