राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त सावर्डे फार्मसी महाविद्यालय मध्ये रक्तदान व मानसिक आरोग्य जनजागृती

सावर्डे, दि. २७ सप्टेंबर : राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी, सावर्डे येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विविध सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये वालावलकर हॉस्पिटल, सावर्डे येथील ब्लड बँक आणि लायन्स क्लब ऑफ सावर्डे आयडियल यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात २७ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
यानंतर विद्यार्थ्यांसाठी “विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचे महत्त्व: ताण, चिंता आणि भावनिक स्वास्थ्य” या विषयावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. प्रवीण वाघचौरे यांनी मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील शैक्षणिक ताण, चिंता, भावनिक अस्थिरता आणि बदलती जीवनशैली यांचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन, सकारात्मक विचारसरणी, वेळेचे नियोजन, नियमित व्यायाम, पुरेशी झोप तसेच कुटुंबीय, मित्र आणि शिक्षकांशी संवाद साधण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, समाजसेवेची भावना, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्राप्रती कर्तव्यभावना रुजविण्याचा संदेश देण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून समाजोपयोगी कार्याचा आदर्श निर्माण केला. या कार्यक्रमात प्रा. प्रितम चौधरी, प्रा. मृणाल करंजकर, प्रा. आदित्य गुरव, प्रा. तेजस निकम, प्रा. प्रणाली पिनागे, प्रा. ममता कदम, प्रा. नयन कर्जावकर, प्रा. मयूर वारे, प्रीती गुरव यांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. अश्विनी पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रोग्राम ऑफिसर श्री. मदन पोमाजे, डॉ. अश्विनी पाटील तसेच सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.



