खड्डे, बंद दिव्यांनी राजापूर नगर पालिका सभागृह तापले
राजापूरच्या विकासकामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; नगरसेवक आक्रमक

राजापूर दि. २६ सप्टेंबर :- राजापूर शहर विकासकामांतून दर्जेदार कामे आणि सोयी-सुविधा मिळाव्यात, याकडे प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाबाबत राजापूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर पडलेले खड्डे, बंद असलेले पथदिवे तसेच अन्य नागरी समस्यांवरून सभेत प्रशासनाला धारेवर धरण्यात आले.
नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकेच्या नव्या सभागृहात बैठक झाली. यावेळी नगरसेवक, नगरपरिषद अधिकारी व विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या काळात शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे नागरिकांना तसेच गणेशभक्तांना वाहतुकीदरम्यान त्रास सहन करावा लागत असल्याचा मुद्दा नगरसेवकांनी उपस्थित केला.
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील पथदिवे बंद असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याकडेही सभेचे लक्ष वेधण्यात आले. बंद पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी करत प्रशासनाने याबाबत तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना नगरसेवकांनी केल्या.
खड्डे तातडीने बुजवा
मुख्य रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी नगरसेवकांनी केली. रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या समस्यांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याचेही नगरसेवकांनी स्पष्ट केले.
धनकचरा व्यवस्थापनावरही चर्चा
शहरातील घनकचरा व्यवस्थापन आणि हायमास्ट तसेच पथदिव्यांच्या देखभालीचा विषयही बैठकीत चर्चेला आला. हायमास्ट बंद असल्याने तसेच पथदिव्यांचे स्टँड वेळेत कार्यान्वित होत नसल्याने नागरिकांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आणण्यात आले. या समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.
आठवडा बाजार सातनंतर बंद करण्याची सूचना
दर गुरुवारी भरविण्यात येणाऱ्या आठवडा बाजाराबाबतही बैठकीत चर्चा झाली. बाजार संपल्यानंतर परिसरात स्वच्छता करण्यासाठी पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते. त्यामुळे आठवडा बाजार सायंकाळी सात वाजल्यानंतर बंद करण्याबाबत निर्णय घेण्याची सूचना प्रशासनाला करण्यात आली. बाजार व्यवस्थापनासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
एकूणच, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मूलभूत नागरी सुविधांबाबत नगरसेवक आक्रमक झाल्याने पालिका सभागृहात विकासकामे आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरून चांगलीच चर्चा रंगली.


