कोदवली येथील धरणक्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा राजापूर नगर पालिकेचा निर्णय

राजापूर दि. २६ सप्टेंबर :- राजापूर शहराचा मुख्य जलस्रोत असलेल्या कोदवली येथील सायबाच्या धरणाच्या खालील बाजूस नवीन धरणाची उभारणी सुरू असून, या धरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. नवीन धरणात सध्याच्या तुलनेत सुमारे सातपट पाणीसाठा होणार असल्याने राजापूर शहराची भविष्यातील पाणीपुरवठा क्षमता अधिक मजबूत होणार आहे. मात्र, धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून कोदवली येथील धरणक्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे.
राजापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी ब्रिटिशांच्या काळात १८७८ मध्ये सायबाच्या धरणाची उभारणी करण्यात आली होती. गेल्या सुमारे १४५ वर्षांहून अधिक काळापासून हे धरण राजापूरकरांच्या पाण्याची तहान भागवत आहे. मात्र, कालांतराने धरणाला गळती लागली असून मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्याची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे शहराच्या वाढत्या पाणीगरजांच्या पार्श्वभूमीवर याच ठिकाणी नवीन धरण उभारण्याचे काम हाती घेण्यात आले.
नवीन धरण पूर्ण झाल्यानंतर राजापूर शहराला मोठा पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भविष्यातील शहराचा विस्तार व विकास लक्षात घेता पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब ठरणार आहे. दरम्यान, धरणाच्या सुरक्षेबरोबरच नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन धरण परिसरात अनधिकृत प्रवेशाला प्रतिबंध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नगराध्यक्ष हुसनबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगरपालिकेच्या सभेत यासंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष विनय गुरव यांच्यासह नगरसेवक तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
राजापूरच्या वास्तव्याच्या काळात ब्रिटिशांनी दूरदृष्टी दाखवत शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी सायबाच्या धरणाची उभारणी केली होती. सुमारे दीडशे वर्षांनंतर या जुन्या धरणाची पाणी साठवण क्षमता कमी होत असल्याने नवीन धरण उभारण्याची गरज निर्माण झाली. नवीन धरणामुळे राजापूरच्या पाणीपुरवठ्याला मोठा आधार मिळणार असला तरी त्याच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर धरण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासह भविष्यात सुरक्षा गार्डही तैनात करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. धरणक्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केल्याने या परिसरात अनधिकृत प्रवेशाला आळा बसून धरणाची सुरक्षितता वाढण्यास मदत होणार आहे. नवीन धरणामुळे राजापूरच्या पाणीपुरवठ्याला बळकटी मिळण्याबरोबरच सुरक्षिततेच्या उपाययोजनांमुळे राजापूरकरांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.


