श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयात भारतीय साक्ष अधिनियमवर सरकारी वकील ॲड. फणसेकर यांचे व्याख्यान

रत्नागिरी दि. १४ जुलै : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालय, रत्नागिरी येथे विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक कायदेविषयक ज्ञानवृद्धीसाठी “भारतीय साक्ष अधिनियम” या विषयावर विशेष अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विधी क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व व रत्नागिरी जिल्हा सरकारी वकील ॲड. अनिरुद्ध फणसेकर यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
प्र. प्राचार्य डॉ. आशिष बर्वे यांनी स्वागत करत विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता कायद्याच्या व्यावहारिक अंगांचा अभ्यास करून स्वतःला सक्षम विधिज्ञ म्हणून घडविण्याची गरज अधोरेखित केली.
ॲड. फणसेकर यांनी भारतीय साक्ष अधिनियमाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, महत्त्वपूर्ण तरतुदी, बारकावे, न्यायालयीन प्रक्रियेतील उपयोगिता तसेच प्रत्यक्ष प्रकरणांतील उदाहरणे यांचे सविस्तर विवेचन केले. विषयाची विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाशी प्रभावी सांगड घालत त्यांनी न्यायालयीन कामकाजात साक्षीचे महत्त्व, पुराव्याचे मूल्य आणि न्यायनिर्णय प्रक्रियेत त्याची निर्णायक भूमिका स्पष्ट केली. विविध प्रत्यक्षिक उदाहरणांमुळे विद्यार्थ्यांना कायद्याची व्यावहारिक अंमलबजावणी अधिक स्पष्टपणे समजली.
या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ज्ञान समृद्ध होण्याबरोबरच न्यायालयीन व्यवहार, कायदेशीर विश्लेषण क्षमता आणि वास्तव जीवनातील कायदेशीर आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक व्यावसायिक दृष्टी विकसित होण्यास मोलाची मदत झाली.


