रत्नागिरी

प्रामाणिकपणाचे मूर्तिमंत उदाहरण : होमगार्ड सौ. अश्विनी निकम यांनी परत केले सव्वा दोन तोळ्यांचे सोन्याचे ब्रेसलेट

पोफळी महानिर्मिती गणेशोत्सव समितीकडून सत्कार

पोफळी दि. २२ सप्टेंबर :- प्रामाणिकपणा आणि कर्तव्याची सांगड घालत रत्नागिरी होमगार्डच्या महिला कर्मचारी सौ. अश्विनी अक्षय निकम (सनद क्रमांक २०९२) यांनी खाकी वर्दीची मान अधिक उंचावणारी कामगिरी केली आहे. पोफळी येथील महानिर्मितीच्या महाराजा गणेशोत्सवादरम्यान हरवलेले सव्व्या दोन तोळ्यांचे सोन्याचे ब्रेसलेट प्रामाणिकपणे परत करत त्यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल गणेशोत्सव समितीच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

चिपळूण जवळील पोफळी येथे ‘महानिर्मितीचा महाराजा’ गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या उत्सवाचे सचिव श्री. संजय घोलपकर यांचे सव्वा दोन तोळे वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट गर्दीत अथवा कार्यक्रमादरम्यान कुठेतरी हरवले होते. मौल्यवान दागिना गहाळ झाल्यामुळे चिंतेचे वातावरण होते.सांस्कृतिक भवनात सापडले ब्रेसलेट याच गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी रत्नागिरी होमगार्ड पथकाच्या सौ. अश्विनी अक्षय निकम या तेथे कर्तव्यावर तैनात होत्या. सांस्कृतिक भवन, पोफळी या ठिकाणी गस्त घालत असताना त्यांना हे सोन्याचे ब्रेसलेट सापडले. कसलाही लोभ न धरता त्यांनी तात्काळ या दागिन्याबाबत वरिष्ठांना आणि गणेशोत्सव समितीला माहिती दिली आणि ते ब्रेसलेट सुरक्षितपणे मूळ मालक श्री. संजय घोलपकर यांच्या स्वाधीन केले.

समितीकडून सन्मान सौ. निकम यांच्या या अजोड प्रामाणिकपणाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. त्यांच्या या सत्कृत्याची दखल घेऊन ‘श्री गणेशोत्सव महानिर्मितीचा महाराजा पोफळी’ या पूर्ण समितीच्या वतीने सांस्कृतिक भवन येथे त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

आजच्या युगात जिथे मूल्यांची घसरण होत आहे, अशा काळात सौ. अश्विनी निकम यांनी दाखवलेली प्रामाणिकपणाची ही भावना आणि कर्तव्यदक्षता अत्यंत कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गौरव केला. या प्रसंगी महानिर्मिती गणेशोत्सव समितीचे सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button