रत्नागिरी

रत्नागिरीत भव्य रोजगार मेळाव्याला उदंड प्रतिसाद; २७ उमेदवारांची थेट निवड, तर १३६ जण पुढील फेरीसाठी पात्र!

कंपनी प्रतिनिधींकडून कौशल्य विकास केंद्राच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक

रत्नागिरी दि. १६ जुलै :- जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून युवकांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ आणि स्किल ट्री कन्सल्टिंग संचलित कौशल्य विकास केंद्र, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने काल रत्नागिरीत एका भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला तरुण-तरुणींचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून, एकूण ६०० पेक्षा अधिक उमेदवारांनी या मेळाव्यासाठी आपली नोंदणी केली होती.

या रोजगार मेळाव्या प्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली याप्रसंगी बोलताना डॉ. साखळकर यांनी, “सध्याच्या स्पर्धात्मक युगात अशा प्रकारचे मेळावे ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना करिअरची नवी दिशा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात,” असे सांगत आयोजकांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

२० नामांकित कंपन्यांचा सहभाग आणि व्यवस्थापनाचे कौतुक

या मेळाव्यात रत्नागिरीसह परिसरातील तब्बल २० नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये विविध क्षेत्रांतील कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या. मेळाव्याला आलेले उमेदवार आणि कम्पनींच्या प्रतिनिधींनी या मेळाव्याच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल आयोजकांचे मनापासून कौतुक केले.

थेट निवड आणि रोजगार संधी

दिवसभर चाललेल्या या मुलाखतींच्या प्रक्रियेनंतर २७ उमेदवारांची कंपन्यांमध्ये थेट नियुक्ती करण्यात आली, तर १३६ उमेदवारांची पुढील निवड प्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. ज्यामुळे उमेदवारांना मध्ये आनंदाचे वातावरण होते.

हा मेळावा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ आणि स्किल ट्री कन्सल्टिंग संचलित कौशल्य विकास केंद्र, रत्नागिरीच्या सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button