कोंढेतर येथे भटक्या कुत्र्यांसाठी सर्व आवश्यक सुविधांनीयुक्त ‘शेल्टर हाऊस’ उभारण्याचा निर्णय

राजापूर दि. २६ सप्टेंबर : गेल्या काही वर्षांत राजापूर शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली असून, त्यांच्या झुंडीमुळे नागरिक, पादचारी व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांचा पाठलाग करणे, चावा घेणे तसेच अपघातांच्या घटना घडत असल्याने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने राजापूर नगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कोंढेतर येथे भटक्या कुत्र्यांसाठी सर्व आवश्यक सुविधांनीयुक्त ‘शेल्टर हाऊस’ उभारण्याचा निर्णय पालिकेच्या सभेत घेण्यात आला.
नगराध्यक्ष ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगरपालिकेच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष विनय गुरव यांच्यासह नगरसेवक व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शहर आणि लगतच्या परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांच्या झुंडी फिरताना दिसत असून, वाहनचालक, पादचारी तसेच शाळकरी मुलांना त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ला करून जखमी केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पालिकेकडून भटक्या कुत्र्यांची नसबंदी, निर्बीजीकरण व लसीकरण मोहीम यापूर्वी राबविण्यात आली होती. त्यामुळे काही प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी झाला होता. मात्र काही महिन्यांनंतर पुन्हा भटक्या कुत्र्यांची समस्या डोके वर काढताना दिसत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती.
शहरात २५० ते ३०० भटके कुत्रे
नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या राजापूर शहरात सुमारे २५० ते ३०० भटके कुत्रे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी एप्रिल २०२५ मध्ये पालिकेकडून नसबंदी व निर्बीजीकरण मोहीम राबविण्यात आली होती. त्यावेळी सुमारे ६६ कुत्र्यांची नसबंदी आणि ८९ कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
कोंढेतर येथे शेल्टर हाऊस
भटक्या कुत्र्यांची समस्या सोडविण्यासाठी कोंढेतर येथे शेल्टर हाऊस उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी बेवारस किंवा जखमी कुत्र्यांसाठी सुरक्षित निवारा, वैद्यकीय उपचाराची सुविधा, नियमित अन्न-पाण्याची व्यवस्था तसेच नसबंदी व लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
या शेल्टर हाऊससाठी आवश्यक आराखडा तयार करण्यात आला असून, सुमारे ५५ लाख रुपयांची आवश्यकता असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आव्हान पालिकेसमोर असणार आहे.
भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणतानाच त्यांच्यामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी शेल्टर हाऊसची योजना महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी केव्हा सुरू होते, याकडे राजापूरवासीयांचे लक्ष लागले आहे.



