रत्नागिरी

कोकणची संस्कृती, परंपरा आणि मातीच्या नात्याला सुरेल मानवंदना

संगमेश्वर दि. २७ सप्टेंबर ( प्रतिनिधी ):- कोकणची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि आपल्या मातीशी असलेलं घट्ट नातं पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावं, या भावनेतून ‘वाट कोकणाची’ हे सुंदर मराठी गीत साकारण्यात आलं आहे. कोकणच्या निसर्गासोबतच येथील जीवनशैली, परंपरा आणि पूर्वजांनी जपलेल्या सांस्कृतिक वारशाची आठवण करून देणारं हे गीत सध्या कोकणप्रेमींच्या भेटीला आलं आहे.

वाट कोकणची – ज्योती भांडे, मालवणी टेल्स या नावाने हे गीत सादर करण्यात आलं असून, ज्योती भांडे आणि विजय मारापल्ली यांनी गीताचं संगीतबद्ध केलं आहे. तर लेखिका – कवयित्री ज्योती घनश्याम यांनी गीतलेखन केलं आहे. कोकणच्या मातीशी असलेलं नातं आणि या भूमीची ओढ गीतातून प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अकोल्याची मूळ असलेल्या ज्योती भांडे यांनी कोकणात भ्रमंती करताना या गाण्याची संकल्पना साकारली. कोकणचा निसर्ग, येथील संस्कृती आणि परंपरा जवळून अनुभवताना निर्माण झालेल्या भावनेतून ‘वाट कोकणाची’ या गीताची निर्मिती झाली.

या संकल्पनेला पुढे भांडुपमधील ‘मिनी कोकण ‘ टीमने आकार दिला. या टीममधील जवळपास निम्मे कलाकार स्वतः कोकणी असल्याने गाण्याच्या निर्मिती प्रक्रियेत त्यांच्या वैयक्तिक अनुभवांचाही स्पर्श झाला आहे.त्यामुळे या गीताशी कलाकारांचं नातं अधिक भावनिक आणि जवळचं झालं आहे. कोकण म्हटलं की, निळाशार समुद्र, हिरवाईने नटलेले डोंगर, कौलारू घरं, गावाकडची जीवनशैली, सण-उत्सव आणि पिढ्यानपिढ्या जपल्या गेलेल्या परंपरा डोळ्यांसमोर उभ्या राहतात. याच कोकणच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख नव्या पिढीला व्हावी, तसेच कोकणापासून दूर असलेल्या कोकणकरांना आपल्या मातीची आठवण करून देण्याचा प्रयत्न या गीतातून करण्यात आला आहे.

‘वाट कोकणाची’ हे केवळ एक गीत नसून कोकणच्या मातीशी असलेल्या भावनिक नात्याचा प्रवास आहे, अशी भावना या गीतामागील संकल्पनेतून व्यक्त होते. कोकणचा वारसा आणि पूर्वजांनी जपलेल्या परंपरा पुढील निर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने साकारलेलं हे गीत कोकणप्रेमींसाठी खास ठरत आहे.कोकणच्या मातीचा सुगंध आणि या भूमीची हाक अनुभवण्यासाठी ‘वाट कोकणाची’ हे गीत नक्की ऐका आणि मित्र-परिवारासोबत शेअर करा, असे आवाहन गीताच्या टीमकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button