रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे आंतरशालेय ‘कचऱ्यातून कलाकृती’ स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी दि. २७ सप्टेंबर : पर्यावरण संवर्धन, पुनर्वापर आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी यांच्या वतीने आंतरशालेय कचऱ्यातून कलाकृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत पटवर्धन हायस्कूल, आठवडा बाजार जवळ, रत्नागिरी येथे होणार आहे. स्पर्धेचा कालावधी दोन तास असून प्रवेश विनामूल्य आहे.
रत्नागिरीतील शाळांमधील इयत्ता ७ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना तीन जणांच्या गटाने या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. टाकाऊ वस्तूंचा कल्पकतेने पुनर्वापर करून आकर्षक व उपयुक्त कलाकृती तयार करणे तसेच त्यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे हा स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार असून सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
स्पर्धेसाठी नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. अधिक माहितीसाठी ९४०५७७३५२७ / ९९७०४४३१३७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
“लहान कल्पना… मोठा बदल!” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक विचार, सर्जनशीलता आणि पुनर्वापराची सवय विकसित करण्याचा रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचा प्रयत्न असल्याचे अध्यक्ष अॅड.मनिष नलावडे यांनी सांगितले.



