रत्नागिरी

शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी दळे ग्रुप ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा

शाळांच्या गरजांवर सकारात्मक चर्चा; लोकसहभाग व सीएसआरच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न

जैतापूर दि. २९ सप्टेंबर : दळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासह विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आज शासनाच्या परिपत्रकानुसार विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. प्रशासक श्री. पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या ग्रामसभेत दळे ग्रुप ग्रामपंचायतीमधील पाच प्राथमिक शाळा तसेच अंगणवाडी यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत शाळांच्या विविध समस्या व गरजांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

यावेळी शाळांची सद्यस्थिती, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, शाळांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच उपलब्ध साधनसामग्री याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शाळांच्या आवश्यक गरजा सीएसआरच्या माध्यमातून तसेच लोकसहभागातून पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना यावेळी मांडण्यात आल्या.

ग्रामसभेत प्रशासक श्री. पाटील यांनी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. ग्रामसभा ही केवळ शासकीय विषयांपुरती मर्यादित न राहता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विचारविनिमयाचे प्रभावी व्यासपीठ आहे. ग्रामस्थांचा सहभाग, सहकार्य आणि सर्व विषयांवर होणारी सकारात्मक चर्चा यामुळे गावाच्या विकासाला योग्य दिशा देता येते. ग्रामसभेच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन चर्चा केल्यास गावाचा सर्वांगीण विकास निश्चितपणे साध्य करता येऊ शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांनीही विशेष मेहनत घेण्याची आवश्यकता असल्याचे श्री. पाटील यांनी नमूद केले. आपण ज्या ठिकाणी काम करतो आणि ज्या ठिकाणच्या व्यवस्थेमुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, त्या ठिकाणी आपण जाणीवपूर्वक विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

शाळा आणि अंगणवाडी या ग्रामीण भागातील भावी पिढी घडविणाऱ्या महत्त्वाच्या संस्था असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत, शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि विविध सामाजिक घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. शासनाच्या निधीसोबतच लोकसहभाग आणि सीएसआरच्या माध्यमातून शाळांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.

या ग्रामसभेला ग्रामसेवक तथा सचिव श्री. गोरक्ष शेलार, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जब्बार काजी, समीर शिरवाडकर, राजन लाड, प्रभाकर खानविलकर, विजय गोरिवले, सत्यवान जाधव यांच्यासह परिसरातील सर्व शाळांचे शिक्षक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. शाळांच्या गुणवत्तावाढीसह गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा सकारात्मक संदेश देत ही विशेष ग्रामसभा उत्स्फूर्त चर्चेत पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button