रत्नागिरी

मानसिक आरोग्य संवर्धनासह अंमली पदार्थांविरोधात जनजागृती

देवरुख दि. २८ सप्टेंबर : जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय रत्नागिरी आणि पोलीस ठाणे देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्य, ताणतणाव व्यवस्थापन तसेच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी विविध शाळांमध्ये मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

या अंतर्गत तुळसणी हायस्कूल, देवरुख; आदर्श विद्यालय, देवरुख; शिवाजी माध्यमिक विद्यालय, कोसुंब तसेच ताम्हणे विद्यालय येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यकर्त्या श्रीम. श्वेता चव्हाण, सामाजिक आरोग्य परिचारिका स्मिता गोठणकर तसेच पोलीस श्री. सागर मुरूडकर आणि श्री. तेजस देशमुख यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

मानसिक आरोग्याचे महत्त्व, दैनंदिन जीवनातील ताणतणावाची कारणे, ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन, भावनिक अडचणींवर मात करण्याच्या पद्धती तसेच गरज भासल्यास योग्य वेळी मदत घेण्याचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच अंमली पदार्थांचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम, व्यसनापासून दूर राहण्याचे महत्त्व आणि चुकीच्या संगतीपासून सावध राहण्याबाबतही विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेताना समस्या किंवा तणाव जाणवल्यास पालक, शिक्षक, समुपदेशक अथवा आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच “नशेला नकार, उज्ज्वल भविष्याला होकार” हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

या उपक्रमासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जगताप व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुमरे यांचे नियोजनात्मक मार्गदर्शन लाभले. शाळांमधील या जनजागृती उपक्रमाला विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button