मोबाईल स्न्याचिंग प्रकरणी तीन आरोपी अटकेत; मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून धडक कारवाई

रत्नागिरी दि. २३ जुलै :- चिपळूण येथे मोबाईल हिसकावून पसार झालेल्या तीन जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सांगली येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपींकडून मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.
दि. 21/05/2026 रोजी सायंकाळी सुमारे ६.४५ वा. पवारवाडी फाटा येथे फिर्यादी आशिष कृष्णा जाधव यांना चिपळूणचा रस्ता विचारण्याच्या बहाण्याने काळ्या रंगाच्या युनिकॉर्न दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. त्यानंतर सुमारे ७.१५ वा. शिरगाव रहाटवाडी येथील दत्त मंदिरासमोर रिया रोहित शिंदे यांच्याबाबतही त्याच पद्धतीने चिपळूणचा रस्ता विचारुन त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून ते तिघेही अज्ञात इसम पसार झाले होते.
याच अनुषंगाने अलोरे पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 24/2026, भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 304(2) व 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक रत्नागिरी, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. बी.बी. महामुनी यांनी तात्काळ मार्गदर्शन करून पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तपास पथके तयार केली होती.
या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत चालू असताना, तपासादरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास गोपनीय व तांत्रिक माहिती प्राप्त झाली. त्या माहितीच्या आधारे या पथकाने दिनांक २२ जुलै रोजी मौजे वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली येथे कारवाई करून खालील तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
१) विश्वनाथ अमर शिंदे, वय 23 वर्षे, रा. शिंदे मळा, देवराष्ट्री रोड, वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली.
२) प्रथमेश मलिक मोरे, वय 20 वर्षे, रा. गणेशनगर, कॅनल शेजारी, वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली.
३) अक्षय संभाजी जाधव, वय 23 वर्षे, रा. पंचशील नगर कॉलनी, मौजे वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली.
सदर आरोपींकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल असा एकूण ₹1,08,000/- किंमतीचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. तसेच पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आरोपी व जप्त मुद्देमाल अलोरे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, रत्नागिटी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा श्री. नितीन ढेरे यांच्या सूचनांनुसार श्रेणी पो.उ.नि., संदीप ओगले, पो.हवा/909 विजय आंबेकर, पो.हवा/1407 दिपराज पाटील, पो.हवा/262 योगेश नार्वेकर, चा.पो.कॉ/215 अतुल कांबळे या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.


