गणपतीपुळे मंदिरात भाद्रपदी गणेशोत्सवाची महाप्रसादाने सांगता
सुमारे २१०० भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

गणपतीपुळे दि. २३ सप्टेंबर (वैभव पवार) :- रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे मंदिरातील भाद्रपदी गणेशोत्सवाची सांगता बुधवारी वामन द्वादशीच्या पवित्र दिनी महाप्रसादाने करण्यात आली. या महाप्रसादाचा लाभ सुमारे २१०० भाविकांनी घेतल्याची माहिती देवस्थान समितीकडून देण्यात आली.
यांमध्ये स्थानिक ग्रामस्थ व विविध ठिकाणांहून आलेल्या भाविक व पर्यटकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला . संस्थान श्री देव गणपतीपुळे यांचेमार्फत प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गणपती मंदिरात भाद्रपदी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. त्यामध्ये श्रींची महापूजा दररोज आरती, मंत्रपुष्प, सुश्राव्य कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम पार पडले.
त्यानंतर गणेश चतुर्थीच्या पवित्र दिवशी मंदिराच्या प्रदक्षिणामार्गे श्रींची वाजत गाजत पालखी मिरवणूक पालखी मिरवणूक मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडली.असे विविधांगी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर या भाद्रपती गणेशोत्सवाची सांगता बुधवारी वामन द्वादशीच्या पवित्र दिवशी महाप्रसादाने करण्यात आले.
हा संपूर्ण भाद्रपदी गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावात व शांततेत पार पाडण्यासाठी देवस्थान समितीची पंच कमिटी, पुजारी, कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी विशेष मेहनत घेतली.



