महाराष्ट्ररत्नागिरी

दुष्काळसदृश्य परिस्थितीचा मत्स्यव्यवसायावर परिणाम; प्रत्यक्ष पाहणीवर आधारित अहवाल तातडीने सादर करा -मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. २२ सप्टेंबर : राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘दुष्काळ ट्रिगर-१’मध्ये मोडणाऱ्या तालुक्यांतील मत्स्य तलाव, जलाशय व संबंधित जलस्रोतांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. प्रत्येक जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीची अचूक माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावी, तसेच मत्स्यव्यवसायावर होणाऱ्या परिणामाची तीव्रता शासनाच्या निदर्शनास आणावी, असेही त्यांनी सांगितले.

याबाबतची बैठक मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात झाली.

राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा मत्स्यव्यवसाय क्षेत्रावर होणारा परिणाम लक्षात घेता, संबंधित प्रादेशिक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून दुष्काळाची तीव्रता तसेच मासेमारी करताना येणाऱ्या अडचणींची माहिती संकलित करावी. मत्स्य तलाव आणि संबंधित जलस्रोतांची सद्यस्थिती प्रत्यक्ष पाहणीच्या आधारे नोंदवून त्याचा अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश मंत्री राणे यांनी दिले.

दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे मत्स्यव्यवसाय क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजनांसाठी विभागाने तत्परतेने कार्यवाही करावी. मच्छिमारांच्या उपजीविकेवर होणारा परिणाम, जलस्रोतांमधील पाणीसाठ्याची स्थिती आणि मत्स्य उत्पादनावर होणारे परिणाम याबाबतची माहिती अचूकपणे संकलित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

अपुरा पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेला अपुरा पाणीसाठा याचा परिणाम मत्स्यबीज संचयन आणि मत्स्योत्पादनावर होत आहे. मत्स्यबीज उत्पादन केंद्रांमध्येही आवश्यकतेनुसार उत्पादनावर परिणाम होत असल्याने ग्रामीण रोजगार आणि मत्स्योत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ट्रिगर-१ मध्ये येणाऱ्या तालुक्यांतील जलस्रोतांची प्रत्यक्ष स्थिती आणि मत्स्यव्यवसायावरील परिणामाची अचूक माहिती संकलित करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे मत्स्यव्यवसाय करणे अडचणीचे ठरत असल्याने मच्छिमारांच्या उपजीविकेवर होणाऱ्या परिणामाचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी विभागाने तयार राहावे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांनी संकलित केलेली माहिती जिल्हाधिकाऱ्यांना सादर करून त्यामध्ये आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे तसेच सर्व संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button