रत्नागिरीत ३ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन जप्त; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी दि. २२ सप्टेंबर :- रत्नागिरी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अमली पदार्थविरोधी कारवाई करत मुरुगवाडा-पांढरा समुद्र परिसरातून ३ ग्रॅम वजनाचे ब्राऊन हेरॉईन जप्त केले. या प्रकरणी एका संशयित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दि. २२ सप्टेंबर रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक शहर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मुरुगवाडा पांढरा समुद्र येथील पाण्याच्या टाकीजवळ संशयित तरुण संशयास्पदरीत्या आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगलेले ३ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन आढळून आले.
पोलिसांनी अमली पदार्थासह एमएच ०८ बीएल ५५१३ क्रमांकाची दुचाकी जप्त केली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास व कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अरांक्षा यादव (भा.पो.से.), परीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात आणि पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाई पथकात पोउनी सागर शिंदे, सपोफौ दीपक साळवी, पोहवा शांताराम झोरे, पोहवा दिनेश आखाडे, पोहवा भालचंद्र मयेकर, पोकॉ अमित पालवे आणि पोकॉ निलेश शिंगवे यांचा समावेश होता.

