रत्नागिरी

निर्भीड विद्यार्थी सर्वेश मायंगडे याचा जाकादेवी विद्यालयातर्फे १० हजार रुपयांचे पारितोषिक देऊन भव्य सत्कार

विल्ये दि. २० (अमित कांबळे) :- रत्नागिरी तालुक्यातील तरवळ येथे झालेल्या घरफोडी चोरी प्रकरणात स्वतः आपल्या मोबाईलवर चित्रीकरण करून गुन्हेगाराचा लागोपाठ पाठलाग करून हातखंबा ग्रामस्थांच्या सहकार्याने गुन्हेगाराला पोलिसांच्या ताब्यात दिल्याच्या विशेष कामगिरीबद्दल जाकादेवी विद्यालयातील इ. ८ वी वर्गातील गुणवान ,धैर्यवान विद्यार्थी कु.सर्वेश संदेश मायंगडे याचा मालगुंड शिक्षण संस्थेच्या जाकादेवी विद्यालयातर्फे आयोजित पालक सभेत जाहीर सत्कार करण्यात आला.

या प्रेरणादायी सत्कार प्रसंगी जाकादेवी विद्यालयाच्या वतीने सर्वेश संदेश मायंगडे याला जाकादेवी स्टाफतर्फे रोख ५ हजार रुपये तसेच सर्वेशचे वडील अर्धांगवायूने त्रस्त असलेल्या गरजवंत पालकाच्या डॉक्टर उपचारासाठी रोख ५ हजार रुपये अशी एकूण १० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.या आर्थिक मदतीमध्ये शिक्षक संस्थेचे चेअरमन सुनिल मयेकर, निमंत्रित संचालक चंद्रशेखर उर्फ बापू मयेकर तसेच जाकादेवी विद्यालयाचा संपूर्ण स्टाफ यांचा समावेश आहे.

गुन्हेगाराला मोठ्या जिद्दीने पकडून देण्याची धैर्यवान कामगिरी केल्याबद्दल सर्वेश संदेश मायंगडे व त्याची आई यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मालगुंड शिक्षण संस्थेचे धडाडीचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी बालरंगभूमी रत्नागिरी शाखेच्या वतीनेही सीमा कदम व त्यांच्या टीमने सर्वेश मायंगडे याचा विशेष सत्कार केला.चोरी करणाऱ्या व्यक्तीला मला पकडून द्यायचे या एका उद्देशानेच मी माझ्या मोबाईलमध्ये शुटींग करुन चोराचा पाठलाग केल्याचे सर्वेश मायंगडे याने सांगितले.

सत्कार कार्यक्रमाप्रसंगी शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल मयेकर, उपाध्यक्ष विवेक परकर,सचिव विनायक राऊत, सहसचिव श्रीकांत मेहेंदळे ,संचालक किशोर पाटील, निमंत्रित संचालक विलास राणे,जाकादेवीचे मुख्याध्यापक नितीन मोरे ,मालगुंड विद्यालयाचे मुख्याध्यापक बिपीन परकर ,काजुर्ली विद्यालयाचे मुख्याध्यापक आशिष घाग, प्रभारी पर्यवेक्षक अरूण कांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष पवार, निवेदक वैभव खानोलकर, क्रीडाशिक्षक संतोष सनगरे, सौ.सायली राजवाडकर,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अर्जुन माचिवले ,काजुर्लीचे सुधाकर गोनबरे यांसह शाळेतील शिक्षक तसेच पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. सर्वेशच्या बालवयातील धाडसी वृत्तीचे चेअरमन सुनिल मयेकर यांनी गोड कौतुक केले. शाळा व संस्थेच्या वतीने या धाडसी विद्यार्थ्याला राज्य व राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळविण्यासाठी शाळेच्या वतीने प्रस्ताव करण्यात येणार असल्याचे सुनिल मयेकर यांनी पालक सभेत आवर्जून सांगितले.

यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी पोलीस खात्यात भरती झाल्याबद्दल सुशांत नंदकिशोर गावडे, रविंद्र दत्ताराम माचिवले आणि वैद्यकीय सेवेत रूजू झाल्याबद्दल डॉ.शशिकला वाडकर यांचाही शाळा व संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.उपस्थितांचे स्वागत व प्रास्तावना मुख्याध्यापक नितीन मोरे यांनी तर सूत्रसंचालन वैभव खानोलकर आणि आभार अरुण कांबळे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button