१७ कोटींच्या निधीतून जिल्हा परिषद शाळांचे रूप पालटणार : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
स्मार्ट उपक्रमांतर्गत कोतवडे क्र. १ व धामणसे सांबरेवाडी प्राथमिक शाळांचे लोकार्पण

रत्नागिरी, दि. २८ नोव्हेंबर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे आणि शहरांमधील शाळांच्या धर्तीवर ग्रामीण शाळाही अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या शाळांचे रूप पालटण्यात येत आहे. स्मार्ट सिटी व विशेष निधीच्या माध्यमातून सुमारे १७ कोटी रुपयांचा निधी खर्च करून या शाळांचे आधुनिकीकरण व नूतनीकरण करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
स्मार्ट उपक्रमांतर्गत कोतवडे प्राथमिक शाळा क्र. १ चे लोकार्पण पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते कोनशिला अनावरण व फित कापून आज झाले. तत्पूर्वी त्यांच्या हस्ते धामणसे सांबरेवाडी प्राथमिक शाळेचेही लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, जिल्हा परिषद सदस्य महेश ऊर्फ बाबू म्हाप, समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे, पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील शाळांच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या १७ कोटी रुपयांच्या निधीतून शाळांना सुसज्ज इमारती व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या निकालांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा क्रमांक नेहमीच अव्वल राहिला असून, या यशात जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे.
शाळांच्या विकासात लोकसहभाग आवश्यक
शाळांचे नूतनीकरण करणे आणि त्या टिकवणे ही जितकी प्रशासनाची जबाबदारी आहे, तितकीच ती पालक, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचीही आहे. कठीण काळातही विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडित सुरू ठेवणाऱ्या शिक्षकांना प्राधान्य व प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागात आरोग्यासोबतच शिक्षणाची व्यवस्था अत्यंत उच्च दर्जाची असावी, यासाठी जिल्हा प्रशासन, पदाधिकारी आणि राज्य शासन कटिबद्ध असून भविष्यातही असे लोकोपयोगी उपक्रम राबवले जातील, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.



