रत्नागिरी

तृतीय पंथीयांच्या हक्काच्या निवाऱ्याचा प्रश्न संवेदनशीलतेने मार्गी लावा; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ हेल्पलाईनवर समुपदेशन

रत्नागिरी, दि. २७ नोव्हेंबर : समाजातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी तृतीय पंथीयांच्या हक्काच्या घरकुलांचा प्रश्न अतिशय संवेदनशीलतेने व गांभीर्याने मार्गी लावावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी प्रशासनाला दिले. पंडित दीनदयाळ उपाध्याय आवास योजना, रमाई आवास योजना आणि कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीचा समन्वय साधून तृतीयपंथीयांना स्वतःचे हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्राधान्याने प्रस्ताव तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले.

जिल्हास्तरीय तृतीयपंथीयांच्या समस्या निवारण समिती, रमाई आवास योजना आढावा आणि ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीच्या संयुक्त बैठकीत जिल्हाधिकारी श्री. जिंदल बोलत होते. यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव, समाजकल्याण सहायक आयुक्त शीतल सोनटक्के, कौशल्य विकास सहायक आयुक्त दत्ता चव्हाण आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

तृतीय पंथीयांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे निर्णय घेताना जिल्हाधिकारी श्री जिंदल म्हणाले, प्रांताधिकारी आणि समाजकल्याण सहायक आयुक्तांनी तृतीय पंथीयांच्या घरकुलांसाठी विशेष पाठपुरावा करून तातडीने प्रस्ताव सादर करावेत.

तृतीय पंथीयांना केवळ निवाराच नव्हे, तर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी शैक्षणिक प्रगतीवर भर द्यावा. तसेच त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी अग्रणी जिल्हा व्यवस्थापकांच्या माध्यमातून बीजभांडवल व कर्ज प्रकरणे तातडीने मंजूर करावीत.

तृतीय पंथीय तसेच अनुसूचित जाती-जमातींशी संबंधित प्रकरणांमध्ये पोलीस विभागाने अत्यंत सतर्कतेने आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातून काम करावे. समाजकल्याण सहायक आयुक्तांनी ‘नोडल अधिकारी’ म्हणून या प्रकरणांचा नियमित पाठपुरावा करावा.

रमाई आवास योजनेत हयगय नको

रमाई आवास योजना (शहरी) अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देताना नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांनी कोणतीही हयगय करू नये. सर्व परिपूर्ण प्रस्ताव स्वीकारून दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, अशी सक्त ताकीद जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी पावले

ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ज्येष्ठांच्या दैनंदिन सोयीसुविधांबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या.

नगरपरिषद हद्दीतील उताराच्या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी ‘रम्बलर स्ट्रिप्स’ बसवण्याचा प्रस्ताव येत्या सात दिवसांत सादर करावा. पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रे स्थापन करण्याबाबत ग्रामपंचायत विभाग आणि गटविकास अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

कार्यालयीन सुविधा आणि हेल्पलाईन

शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांग आणि बसण्याची सुयोग्य व्यवस्था असावी. तसेच, ज्येष्ठांच्या मदतीसाठी असलेल्या १४५६७ या हेल्पलाईनची व्यापक प्रसिद्धी करून गरजूंना समुपदेशन उपलब्ध करून द्यावे, असेही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button