रत्नागिरी

रत्नागिरीतील हॅपी मेडिकेअर सेंटरच्यावतीने विठूमाऊलीची दिंडीयात्रा

रत्नागिरी दि. २७ जुलै :- आषाढी एकादशी निमित्त शहरातील मारुतीमंदिर येथील हॅप्पी मेडिकेअर सेंटरच्या वतीने आणि प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आषाढी एकादशी निमित्त वारीचे आयोजन करण्यात आले होते. मारुती मंदिर येथील नाईक मोटर्ससमोर असलेल्या हॅपी मेडिकेअर सेंटरमधून या वारीला सुरुवात करण्यात आली.

विठ्ठलाच्या वेशभूषेतील बबन रामचंद्र कोकरे हे ७६ वर्षांचे गृहस्थ आणि रखुमाईच्या वेशभूषेत सुनीता बबन कोकरे वय ६८ हे दांपत्य या दिंडीच्या अग्रस्थानी होते. त्यांच्या मागोमाग हॅपी मेडीकेअर सेंटरच्या सुमारे दीडशे स्त्री-पुरुषांनी हातात टाळ चिपळ्या घेऊन पारंपारिक वेशात दिंडीला सुरुवात केली. ही दिंडी हॅप्पी मेडिकेअर सेंटरपासून निघाली ती मारुतीमंदिरला प्रदक्षिणा घालून माळनाक्यापर्यंत आली आणि तिथून परत हॅपी मेडिकेअर सेंटर येथे या वारीची सांगता करण्यात आली.

या वारीमध्ये सुमारे ३५ ते ८० वयोगटातील सर्व स्त्री-पुरुष आनंदाने सहभागी झाले होते. जणू पंढरीच्या वारीतच असल्याप्रमाणे सर्वजण उत्साहाने टाळ वाजवत नाचत होते. भगवे ध्वज हातात घेऊन ही दिंडी विठ्ठलनामाचा गजर करत मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.

यावेळी सेंटरचे व्यवस्थापक प्रभाकर शिंदे यांच्यासह सेंटरचे सेवाभावी कर्मचारी रिया गराटे, अभिजीत मोरे, रोहिणी सावंत, अनुराधा चव्हाण, मेहक सैय्यद, सायली लासे, तन्वी साळवी, प्रसाद चव्हाण उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button