मिशन रायझिंग फ्लॉवर्स या उपक्रमांतर्गत रत्नागिरी पोलिस दलाच्या वतीने मालगुंड प्रशालेत विशेष कार्यक्रम

तरवळ दि. २२ (अमित जाधव) :- रत्नागिरी पोलिस दलाच्या वतीने सध्या राबविल्या जाणाऱ्या मिशन रायझिंग फ्लॉवर्स या विद्यार्थांच्या सुरक्षिततेसाठी विशेष तयार करण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मालगुंड येथे दिनांक 20 जुलै रोजी दुपारच्या सत्रात जयगड सागरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संजय पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनापर कार्यक्रमाने पार पडला.
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर मिशन रायझिंग फ्लॉवर्स हे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षितता, सजगता, आणि स्वसंरक्षण अभियान यांच्या माध्यमातून सुरक्षित बालपण, सजग विद्यार्थी आणि सक्षम भविष्य अशा प्रकारचा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बागाटे व रत्नागिरी जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक श्री महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाभर हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यातून जिल्ह्यातील सर्व शाळांमधून जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितते संदर्भात बहुमोल असे मार्गदर्शन या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बागाटे त्यांची संपूर्ण टीम करीत आहे.
मोबाईलचा अतिरेक टाळावा
सध्या मोबाईल मुळे सोशल मीडिया विद्यार्थांच्या अगदी हातात आला आहे, त्यामुळे त्याचा वापर मर्यादित करायला पाहिजे. सोशल मीडियाचा वापर मर्यादित केला पाहिजे. मोबाईल चा वापर चांगल्या गोष्टीसाठी करावा. मोबाईलवर जास्त वेळ व्हिडिओ रील पाहणे धोकादायक आहे. या रिल बघताना आपला मेंदू पूर्णपणे बंद पडतो, मेंदू काहीच काम करीत नाही. अनोळखी व्यक्तीशी मैत्री करू नका, अनोळखी नंबर वर कोणताही OTP शेअर करू नका, अनोळखी नंबर वरून आलेल्या कोणत्याही लिंक वर क्लिक करू नका. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका.
अंमली पदार्थांच्या सेवनापासून स्वतःला दूर ठेवा. एखादा विद्यार्थी अंमली पदार्थांचे सेवन करीत असेल नशा करीत असेल तर अशा विद्यार्थ्याची माहिती शिक्षक तसेच मुख्याध्यापक यांना द्या. परिसरात अंमली पदार्थांचे सेवन करीत असेल तसेच कोणी विक्री करीत असेल त्याची माहिती शिक्षक तसेच मुख्याध्यापक यांना द्यावी.
चांगला स्पर्श वाईट स्पर्श (गुड टच बॅड टच) ओळखायला शिका. जर एखादा अनोळखी व्यक्ती किंवा तुमच्या ओळखीला व्यक्ती वारंवार तुमच्या शरीराला जाणीवपूर्वक वारंवार स्पर्श करत असेल तर त्याची माहिती शिक्षक तसेच मुख्याध्यापक आणि आपल्या घरातील व्यक्तींना द्या. असा स्पर्श तुम्हाला जाणवत असेल तर मोठ्याने ओरडून त्याचा प्रतिकार करा किंवा सदर घटनेची त्वरित माहिती तुमच्या जवळच्या व्यक्तीला द्या. तसेच अंमली पदार्थांचे दुष्परिणाम काय होतात या विषयी सविस्तर माहिती दिली. व या विषयावर जनजागृती करणे आवश्यक आहे.
विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतले पाहिजे. स्वतःला नेहमी तयार ठेवले पाहिजे. विशेष करून मुलींनी स्वसंरक्षण करण्यासाठी कराटे तसेच तायक्वांडो सारखे स्वसंरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरणारे खेळ आत्मसात केले पाहिजेत, कारण ती कालची गरज आहे.
सुरक्षित वाहतूक या विषयी सविस्तर माहिती सुद्धा दिली गेली. सध्या बरेचसे विद्यार्थी आपल्या पालकांच्या दुचाकी घेऊन शाळा महाविद्यालयांमध्ये प्रवेश करत असतात. अशा वेळी कोणत्याही सुरक्षिततेच्या नियमांचे पालन त्यांच्या कडून केले जात नाही. त्यामुळे १८ वर्षा पेक्षा कमी वय असलेल्या विद्यार्थ्यांना वाहन चालविण्याची कोणतीही परवानगी कायद्यामध्ये नाही. समजा अशा विद्यार्थ्यांनि कोणताही अपघात केला तर त्याचा गुन्हा त्यांच्या पालकांवर दाखल केला जातो. जर त्यामध्ये ते दोषी आढळले तर त्यांना आर्थिक दंड भरावा लागतो तसेच सध्या शिक्षेची तरतूद कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे.त्यामुळे विद्यार्थांनी वाहने चालवताना सुरक्षित चालवावीत. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षितते बरोबर त्यांच्या भविष्यातील करिअर संदर्भात अशा अनेक विषयांवर सखोल माहिती चांगल्या प्रकारे माहिती देण्यात आली. सुरक्षित बालपण आणि सशक्त पिढी घडविणे या व्यापक उद्देशाने या मिशनची पायाभरणी करण्यात आलेली आहे असे जयगड सागरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संजय पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी रत्नागिरी पोलिस दलाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सुरक्षितते संदर्भात चित्रफिती विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे सेवन केल्यानंतर होणारे दुष्परिणाम, सायबर सुरक्षितता, स्वसंरक्षण, वाहतूक नियमांचे पालन अशा अनेक प्रकारच्या चित्रफिती विद्यार्थ्यांना दाखविण्यात आल्या. व त्या द्वारे जनजागृती करण्यात आली व विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. व हे सर्व विद्यार्थी भविष्यात एक सजग नागरिक म्हणून समाजामध्ये जावे हा या पाठीमागचा उद्देश आहे असे ही या निमित्ताने पोलिस दलाच्या वतीने सांगण्यात आले
या विशेष कार्यक्रमाला जयगड सागरी पोलिस ठाणे येथील अधिकारी मिलिंद कदम, शिवम आंबुलकर, प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर पर्यवेक्षक उमेश केळकर ज्येष्ठ शिक्षक रमेश पाटील तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रशालेतील शिक्षक अमित जाधव यांनी व्यक्त केले.



