कसबा येथील कालभैरव मंदिरात कार्तिकस्वामी दर्शनयोग

संगमेश्वर दि. २३ नोव्हेंबर ( प्रतिनिधी ) :- मंदिरांचं गांव अशी ओळख असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील श्रीकालभैरव मंदिरात यंदा श्री देव कार्तिकस्वामी दर्शनयोग आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, २३ नोव्हेंबरच्या उत्तररात्री ०२: ०२ पासून सुरू होणारा हा दर्शनयोग मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी रात्री ८.२३ वाजेपर्यंत भाविकांना घेता येणार आहे.
कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष दर्शनासाठी मंदिर दिवस-रात्र खुले ठेवण्यात येणार असल्याचे मंदिर ट्रस्टतर्फे कळविण्यात आले आहे. या कालावधीत भाविकांना श्री कार्तिकस्वामींचे दर्शन घेता येणार आहे.
पुराण परंपरेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या या विशेष योगाला धार्मिक महत्त्व आहे. या योगामध्ये दर्शन घेतल्यास लक्ष्मीप्राप्तीसाठी ते लाभदायक असल्याचे मानले जाते. तसेच या विशेष योगात महिलांनाही श्री कार्तिकस्वामींचे दर्शन घेता येते, अशी श्रद्धा आहे.
कसबा येथील कालभैरव मंदिर हे परिसरातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ असून, कार्तिकस्वामी दर्शन योग दरम्यान भाविकांची विशेष उपस्थिती असते. यंदाही दर्शनयोगाच्या निमित्ताने भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कालभैरव देवस्थान ट्रस्ट कसबा यांच्यातर्फे करण्यात आले आहे. दर्शनयोग : सोमवार, २३ नोव्हेंबरच्या उत्तररात्रीपासून मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी रात्री ८.२३ वाजेपर्यंत. स्थळ : श्री कालभैरव मंदिर कसबा



