रा. भा. शिर्के प्रशालेच्या नानल गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांनी केले विविध संकल्प

रत्नागिरी दि. १५ जुलै : रा. भा. शिर्के प्रशालेच्या बाबासाहेब नानल गुरुकुलमध्ये वर्षारंभ व संकल्प दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी वैविध्यपूर्ण संकल्प केले. यात प्रामुख्याने नियमित योगासने, पाढे पाठ करणे, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवणे, हार्मोनियम व पखवाज शिकणे, उत्तम कबड्डी व क्रिकेटपटू बनणे, नवीन भाषा शिकणे आणि सामाजिक जबाबदारीचे विविध संकल्प विद्यार्थ्यांनी केले.
याप्रसंगी व्यासपीठावर गुरुकुलप्रमुख किरण सनगरे, समन्वयक प्रा. मकरंद दामले, प्रमुख पाहुणे अनिरुद्ध जोशी, माजी विद्यार्थिनी डॉ. सायली जाधव आणि प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. कांबळे उपस्थित होते.
गुरुकुल समन्वयक प्रा. मकरंद दामले यांनी सांगितले की, “संकल्प हा मनुष्याच्या जीवनाला दिशा देणारा आणि इच्छेला कृतीत बदलणारा अत्यंत महत्त्वाचा मानसिक पैलू आहे. केवळ इच्छा असणे आणि संकल्प करणे यात मोठा फरक आहे. एखाद्या ध्येयाशी ठामपणे बांधील राहून तो पूर्ण करण्यासाठी आपल्या शरीरातील ताकद व ऊर्जा पणाला लावणे म्हणजे संकल्प होय. मनामध्ये जेव्हा कोणताही विकल्प उरत नाही, तेव्हा संकल्पाची ताकद हजार पटीने वाढते.”
याप्रसंगी दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या शारदा पटवर्धन (प्रथम), मीरा चव्हाण (द्वितीय) आणि चैतन्य शितप (तृतीय) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे अनिरुद्ध जोशी यांनी ओघवत्या भाषणातून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. माजी विद्यार्थिनी डॉ. सायली व पर्यवेक्षिका सौ. कांबळे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सूत्रसंचालन मनस्विनी भोळे यांनी केले.



