क्रीडारत्नागिरी

लोणावळा वर्षा मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीच्या मानसी मराठे, अजित किंजळे, गुहागरचे अनंत तानकर विजयी

रत्नागिरी दि. १४ जुलै : नुकत्याच झालेल्या लोणावळा वर्षा मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीतील महिला धावपटू मानसी मराठे यांनी त्यांच्या ३५ किमीमध्ये द्वितीय, वाटद खंडाळा येथील धावपटू अजित किंजळे याने ३५ किमीमध्ये द्वितीय आणि गुहागरमधील अनंत तानकर यांनी दहा किमीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावून जिल्ह्याचे नाव उंचावले. रविवारी रत्नागिरीतील ३० जण लोणावळा वर्षा मॅरेथॉनमध्ये, १० जण कुडाळ मान्सून मॅरेथॉनमध्ये व ५० जणांनी सायकलवारीमध्ये सहभाग घेऊन फिटनेस चळवळीला गती दिली.

लोणावळा वर्षा मॅरेथॉनमध्ये वाटद खंडाळा येथील किंजळेवाडीतील अजित अनंत किंजळे याने यश मिळवले. पुरुषांच्या ३१ ते ४० वयोगटामध्ये ४ तास २२ मिनीटांत धाव पूर्ण करून दुसरा क्रमांक पटकावला. बी. कॉमची पदवीधारक असलेला बांधकाम व आंबा व्यवसाय करत असलेला अजित किंजळे कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमुळे नियमित सराव करू लागला. २०२४ पासून कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्यापासून त्याने आतापर्यंत विविध मॅरेथॉन स्पर्धांत यश मिळवले आहे. कोकण कोस्टलचे प्रसाद देवस्थळी व अनेकांकडून मार्गदर्शन घेऊन त्याने सांगली कर्ण मॅरेथॉन २०२५ मध्ये द्वितीय क्रमांक, विजेता ग्रुपच्या स्पर्धेत द्वितीय व महाडमध्ये झालेल्या २१ किलोमीटर मॅरेथॉनमध्येही द्वितीय क्रमांक मिळवला. कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या मार्गावर धावण्याचा फायदा सगळीकडे होतो असे त्याने या वेळी सांगितले.

पोमेंडी बुद्रुक येथील सौ. मानसी मराठे यांनी ३५ किमी अंतर ४ तास ३१ मिनीटांत पार करून महिलांच्या ४१ ते ५० या वयोगटामध्ये द्वितीय क्रमांक पटकावून रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. यापूर्वी त्यांनी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्येही सुयश मिळवले आहे आणि कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या प्रॅक्टिस रनच्या नियोजनामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.

लोणावळा मॅरेथॉनच्या ४१ ते ५० या वयोगटात १० किमीच्या अंतर ४५ मिनीटांत पार करून गुहागरच्या अनंत तानकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. यापूर्वी तानकर यांनी कोकण कोस्टल मॅरेथॉन तसेच इतर अनेक मॅरेथॉन आणि सायकलिंगच्या स्पर्धांमध्ये सुयश मिळवले आहे. लोणावळा वर्षा मॅरेथॉनसाठी कॉम्रेड्स मॅरथॉनमध्ये यशस्वी सहभाग घेतलेले धावपट्टू अभिजित पड्याळ यांनी बहुमोल मार्गदर्शन रत्नागिरीतील धावपट्टूंना केले होते. तांत्रिक मार्गदर्शनासह मॅरेथॉनचा मार्ग, धुके, पाऊस याबाबत माहिती दिली. कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या आतापर्यंत १०२ प्रॅक्टिस रन झाल्या असून यात सहभागी धावपट्टू अनेक ठिकाणी जाऊन यश मिळवत आहेत. एकंदरीत रत्नागिरीत धावण्याची चळवळ आता रुजू लागली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button