रत्नागिरी

पैसा फंड कलादालनातील कलाकृती पाहून आपल्यातील कलाकार जागा झाला – ॲड. चेतन पालकर यांचे प्रतिपादन

संगमेश्वर दि. २४ सप्टेंबर ( प्रतिनिधी ):- बालपणा पासून आपल्याला कलेची आवड होती. शाळेत असताना चित्रं चांगली काढत असल्यामुळे आपल्याला कला शिक्षकांकडून शाब्बासकी मिळत असे. मात्र कलेची ही आवड अचानक लोकांना न्याय मिळवून देण्याच्या कर्तव्यात आणि कलेत बदलली. पैसा फंड मधील उत्तमोत्तम कलाकृती पाहून परत एकदा आपल्यातील कलाकार जागा झाला,असे प्रतिपादन रत्नागिरी येथील ख्यातनाम वकील चेतन पालकर यांनी केले.

व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कुलच्या कलाविभागाने उभारलेल्या पैसा फंड कलादालनाला आज रत्नागिरी येथील प्रसिद्ध वकील चेतन पालकर यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांचे संस्था सचिव धनंजय शेट्ये यांनी पुष्प आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक प्रकाश दळवी, शिक्षक विनोद ढोर्लेकर, छाया चित्रकार मिनार झगडे आदि उपस्थित होते.

व्यापारी पैसा फंड संस्थेने कलेसाठी स्वतंत्र कलावर्ग, डिजिटल कलाशिक्षण अशा सुविधा उपलब्ध करुन जिल्ह्याच्या कला क्षेत्रात संस्थेची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे हे अभिनंदनीय आहे . गेली २६ वर्षे विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कलाकृतींचा ‘ कलासाधना ‘ या चित्रकला वार्षिकच्या माध्यमातून केलेला चित्र संग्रह म्हणजे संस्था आणि शाळेचा मोठा ठेवा असल्याचे मत पालकर यांनी व्यक्त केले. प्रशालेच्या कलादालनाला भेट देवून चेतन पालकर यांनी येथील कलाकृती आणि विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक केले त्याबाबत संस्था सचिव धनंजय शेट्ये यांनी त्यांना धन्यवाद दिले. अखेरीस विनोद ढोर्लेकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button