रत्नागिरी

भक्तिमय वातावरणात ‘बाप्पा’ला निरोप: पंचनदी राणेवाडीत १२ दिवसांच्या गणेशमूर्तींचे भव्य विसर्जन

पंचनदी दि. २५ सप्टेंबर (सागर गोवळे) :- ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष आणि टाळ-मृदंगाचा गजर… अशा अत्यंत उत्साही, आदरयुक्त आणि शांततापूर्ण वातावरणात दापोली तालुक्यातील पंचनदी – राणेवाडी येथे १२ दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.

गेले बारा दिवस राणेवाडीत भक्तीचा आणि आनंदाचा महापूर आला होता. रोज सायंकाळी होणाऱ्या आरत्या, हरिपाठ आणि भजनांच्या सुरांनी परिसर दुमदुमून गेला होता. विसर्जन सोहळ्याच्या दिवशी संपूर्ण राणेवाडी ग्रामस्थ एकत्र आले होते.

पारंपरिक पोशाखात महिला आणि बालगोपाळ रमले

या विसर्जन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे गावच्या महिला वर्ग आणि लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग! पारंपरिक पोशाखात सज्ज झालेल्या महिलांनी टाळांच्या गजरात धरलेला ठेका आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असलेला भक्तीभाव यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. तरुणांनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचत बाप्पाला निरोप दिला.

गदारोळमुक्त मिरवणूक; कोकणी एकोप्याचे दर्शन

कुठलाही धांगडधिंगा किंवा गदारोळ न करता, अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण मार्गाने ही मिरवणूक विसर्जन स्थळापर्यंत काढण्यात आली. कोकणातील पारंपरिक संस्कृती, आपुलकी आणि एकोप्याचे दर्शन या विसर्जन सोहळ्यातून पुन्हा एकदा घडले.

शेवटी अश्रूभिजल्या डोळ्यांनी आणि जड अंतःकरणाने राणेवाडीवासियांनी आपल्या लाडक्या विघ्नहर्त्याला निरोप दिला आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’ची हाक मारली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button